* फिरता जिना :
(एस्कॅलेटर). एका पातळीवरून (वा मजल्यावरून)
दुसऱ्या पातळीवर (वा मजल्यावर) प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे व
क्षितिजसमांतर पातळीशी योग्य कोन करून
सतत फिरत राहणारे हे एक यांत्रिक साधन आहे. प्रवासी जिन्याच्या पायऱ्यांवर
सामान्यतः एक ते तीन रांगा करून उभे राहतात व जिन्याच्या फिरण्याच्या दिशेनुसार
वरील वा खालील पातळीवर नेले जातात.
फिरत्या जिन्याने ताशी ५,००० ते १०,००० प्रवाशांची (म्हणजे
विद्युत् लिफ्टपेक्षा सु १० पट) वाहतूक करता येते. जिन्याची ही क्षमता जिन्याची
रूंदी, वेग व जिन्यावर प्रवेश करणाऱ्या
प्रवाशांची संख्या घनता यांवर अवलंबून असते. अमेरिकेत जिन्याची प्रमाणभूत रूंदी ८१·३ सेंमी. व १२९·९ सेंमी. आणि
वेग २७·४ मी. व ३६·६ मी. प्रती मिनिट ठरविण्यात आले आहेत (रेल्वे स्थानकावर
वापरण्यात येणाऱ्या जिन्यांचा वेग ५४·८ मी. प्रती
मिनिटपर्यंत असतो). वरील रुंदीचे जिने २७·४ मी. प्रती मिनिट वेगाने अनुक्रमे ८५ व १३५ प्रवासी प्रती मिनिट वाहून नेऊ
शकतात. जिन्याचा क्षितिजसमांतर दिशेशी होणारा प्रमाणभूत कोन ३०° ठरविण्यात आला
आहे. प्रवाशांची संख्या निरनिराळ्या मजल्यांवर तसेच क्षणोक्षणी बदलणारी असली, तरी त्यांची वाहतूक फिरत्या जिन्याच्या साहाय्याने सुलभपणे
करता येते. बदलत्या वाहतुकीच्या ओघाच्या दिशेनुसार जिन्याच्या फिरण्याच्या दिशा
बदलता येते. बऱ्याचशा भुयारी रेल्वे स्थानकांवर फिरते जिने तीनतीनच्या गटाने
बसविलेले असतात. त्यांपैकी दोन विरूद्ध दिशांनी चालविले जातात आणि तिसरा जिना
गर्दीचा अधिक ओघ ज्या दिशेने असेल त्या दिशेने चालविला जातो.
फिरत्या जिन्याने प्रामुख्याने सापेक्षतः कमी अंतरावर
मोठ्या प्रमाणावरील प्रवाशांची वाहतूक केली जाते, तर विद्युत् लिफ्टने अनेक (पण सापेक्षतः कमी) लोकांची मोठ्या अंतरावर वाहतूक
करण्यात येते. थांबावे न लागता तत्काळ चालक सेवकाशिवाय, सुरक्षितपणे व सुलभपणे अनेक मजली उंचीपर्यंत फिरत्या जिन्याने अरुंद वाहतूक करता येते. तसेच तो
सापेक्षतः कमी जागेत मावणारा व चालविण्याचा खर्च कमी येणारा असल्यामुळे अनेक ठिकाणी (विशेषतः वस्तू भाडारांत) त्याने विद्युत्
लिफ्टची जागा घेतलेली आहे. मोठ्या विविध वस्तुभांडारांत निरनिराळ्या मजल्यांवरील वस्तू
पाहण्यासाठी ग्राहकांना फिरता जिना अतिशय सोयीचा ठरला आहे. हवाई, रेल्वे, बस वाहतूक
स्थानके, हॉटेले, कार्यालयीन इमारती, वस्तुसंग्रहालये, शैक्षणिक
संस्था, रूग्णालये, क्रीडांगणे अशा ठिकाणी गर्दीच्या वेळी लोकांच्या
वाहतुकीसाठी फिरते जिने मोठ्या प्रमाणावर वापरण्यात येतात.
* इतिहास :
फिरत्या
जिन्यासंबंधी १८५९ मध्ये अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत एक एकस्व (पेटंट) देण्यात
आले होते पण त्याचा उपयोग करण्यात आला नाही. सुरूवातीचा फिरता जिना म्हणजे केवळ एक
वाहक निरंत पट्टा होता. व त्यावर आधाराकरिता पाचरींची योजना केलेली असे. जेसी
डब्ल्यू. रेनो व चार्ल्स डी. सीबर्गर यांनी दोन निरनिराळ्या प्रकारच्या फिरत्या
जिन्यांचा १८९० च्या सुमारास शोध लावला. या दोन्ही जिन्यांच्या अभिकल्पांत (आराखड्यांत)
दोष होते. रेनो पाचर प्रकारात कमी चढाचा कोन वापरण्यात येत असल्यामुळे त्याला
जागा जास्त लागत असे. सीबर्गर प्रकारात जिन्याच्या एका कडेने चढावे वा उतरावे
लागत असल्यामुळे तो काहीसा धोक्याचा होता. ओटिस एलेव्हेटर कंपनीने या दोन्ही
प्रकारच्या जिन्यांचे हक्क विकत घेतले. याँकर्स येथील ओटिस कंपनीच्या कारखान्यात
पहिले फिरते जिने तयार करण्यात व वापरण्यात आले. त्यांपैकी एक कारखान्यात
प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी १९०२ पर्यंत वापरण्यात येऊन नंतर शिकागो येथील एका
वस्तुभांडारात बसविण्यात आला. सार्वजनिक वापरातील पहिला फिरता जिना पॅरिस येथील
१९०० साली भरलेल्या प्रदर्शनात ओटिस कंपनीतर्फे बसविण्यात आला. त्यानंतर न्यूयार्क
येथील भुयारी रेल्वे स्थानकांवर व ब्लुमिंगडेल या वस्तुभांडारात फिरते जिने
वापरात आले. भारतात मुंबई येथे गिरगाव चौपाटीजवळ एक फिरता जिना बसविण्यात आलेला आहे.
ओटिस कंपनीने १९२१ मध्ये रेनो व सीबर्गर यांच्या
अभिकल्पातील पायऱ्यांची चांगली वैशिष्ट्ये एकत्र करून आडव्या पाचरीसारख्या पायऱ्या
असलेले जिने तयार केले. या जिन्यात एका फणीसारख्या दाते असलेल्या पट्टाच्या
(पत्र्याच्या) साहाय्याने प्रवाशाचे पाय हळूच उचलले जाऊन तो जिन्याच्या रमण्यावर
सुरक्षितपणे उतरू शकेल अशी व्यवस्था करण्यात आली (असा पट्ट अद्यापही वापरण्यात
येतो). चढाचा कोन ३०° ठरविण्यात आला
व हा कोन पायऱ्यांच्या मापाच्या दृष्टीने योग्य असल्याचे दिसून आले. त्यानंतर १९३२-३३ मध्ये वेस्टिंगहाऊस इलेक्ट्रिक एलेव्हेटर
कंपनीने विद्युत् जिना तयार केला. त्यात आडव्या पायऱ्यांवर अरुंद पाचरी
बसविलेल्या होत्या व धातूचा कठडाही होता. वेग वाजवीपेक्षा जास्त होणे, साखळ्या तुटणे इ. धोक्याच्या प्रसंगी जिना तत्काळ थांबावा
म्हणून विविध सुरक्षा उपाय योजण्यात आले होते. आवाजरहित कार्य, चढण्या-उतरण्याची सुलभता व सुधारलेले बाह्यरूप यांमुळे नंतर
फिरत्या जिन्यांची लोकप्रियता वाढीस लागली. १९४० सालानंतर फिरत्या जिन्यांचे
मोठ्या प्रमाणावर प्रमाणीकरण झाल्यामुळे त्यांची सापेक्ष किंमत कमी होण्यास व
वाढत्या विविध प्रकारांच्या इमारतींमध्ये त्यांचा वापर होण्यास मदत झाली.
* रचना व कार्य :
फिरता जिना हा दोन निरंत साखळ्यांना बांधलेल्या पायऱ्यांच्या मालिकेचा बनलेला
असतो. या पायऱ्या आणि साखळ्या एका पोलादी कैचीत वा चौकटीत बंदिस्त केलेल्या असतात.
ही चौकट माथ्याच्या व तळाच्या जागी इमारतीच्या सांगाड्याला पक्की जोडलेली असते.
साखळ्या जिन्याच्या तळाशी व माथ्यावर
असलेल्या दातेरी चक्रांवरून जातात. माथ्यावरील दातेरी चक्रांना पायऱ्यांच्या रुंदीनुसार १० ते २० अश्वशक्तीचे
एक विद्युत् चलित्र (मोटर) प्रदान वेग कमी करणाऱ्या दंतचक्रमालिकेद्वारे जोडलेले
असते. त्यामुळे पायऱ्यांना अखंड व एकसारखी गती प्राप्त होते.
प्रत्येक पायरी म्हणजे एका अलग गाड्यासारखी (ट्रॉलीसारखी)
असून तिचा आकार इंग्रजी उलट्या L अक्षरासारखा
असतो. प्रत्येक पायरीला चार छोटी चाके जोडलेली असतात. यांतील वरची चाके खालच्या
चांकापेक्षा एकमेकांपासून दूर बसविलेली असतात व ती वेगळ्या रूळजोडीवरून फिरतात.
वरची चाके साखळ्यांना जोडलेली असतात. जिन्यांच्या जवळजवळ पूर्ण लांबीभर दोन्ही
रूळजोड्या जिन्याच्या चढाइतकाच कोन करतात परंतु माथ्यावरील पायऱ्या परतीच्या
दिशेने जिन्याच्या खालच्या बाजूने जाण्यास सुरूवात होण्याच्या जागेपासून थोड्या
अंतरावर आतील रूळजोडी बाहेरील रूळजोडीच्या खाली येईल अशी रचना केलेली असते
(जिन्याच्या तळाशी यासारखीच रचना केलेली असते). यामुळे हळूहळू पायऱ्यांची उंची कमी
होऊन शेवटी दोन-तीन पायऱ्या जमिनीच्या पातळीत येऊन जिन्यावर सुलभपणे चढण्यास व
उतरण्यास सपाट फलाट तयार होतो.
* फिरता जिना :
(अ) सर्वसाधारण रचना :
(१) पायरी, (२) पायऱ्या जोडलेली साखळी, (३) पायरीची वरची चाके, (४) पायरीची
खालची चाके, (५) आधारपट्टा, (६) आधारपट्ट्याला ताण देणारी प्रयुक्ती, (७) आधारपट्ट्याला गती देणारे चाक, (८) रूळ, (९) फणीसारखा
पट्टा, (१०) चालक यंत्रणा व गतिरोधक, (११) विद्युत् चलित्र, (१२) खालचा रमणा, (१३) वरचा रमणा
(आ) पायरीची रचना :
(१) पायरी, (२) खालची चाके, (३) आतील रूळ, (४) वरची चाके, (५) बाहेरचा रूळ,
(६) निरंत साखळी (इ) जिन्याच्या माथ्यावरील पायऱ्यांची मांडणी :
(१) पायरीची
खालची चाके, (२) रूळ, (३) वरची चाके, (४) साखळी
(ई)
माथ्यावर सपाट फलाट तयार होताना होणारी पायऱ्यांची हालचाल :
(१) आतील रूळ, (२) बाहेरील रूळ,
(३) वरची चाके, (४) खालची चाके.
जिन्याच्या दोन्ही बाजूंना कठडा बसविलेला असून त्यामुळे
प्रवाशांना आधार मिळतो व जिन्याची यंत्रणा त्यात झाकून टाकता येते. प्रत्येक
कठड्याच्या वरती आधारासाठी हाताने धरण्याकरिता कॅनव्हास व रबर यांपासून तयार
केलेला एक लवचिक पट्टा असून तो पायऱ्यांइतक्याच वेगाने व त्याच दिशेने फिरत असतो.
हे पट्टे जिन्याच्या चलित्राच्या चालक दंडाला दंतचक्र व साखळी यंत्रणेने जोडलेले असतात. पट्टा ताठ राहण्यासाठी त्यावर कठड्यातील
एका चाकाद्वारे ताण दिलेला असतो व त्यामुळे तो वरच्या व खालच्या कप्प्यांवरून घसरत
नाही.
साखळ्या तुटणे, जास्त भार येणे
अथवा गतिमान पायरीची कडा व स्थिर काठ यांमध्ये एखादी वस्तू अडकणे यांसारख्या
कारणांनी यांत्रिक बिघाड निर्माण झाल्यास किंवा विद्युत् यंत्रणेत दोष उद्भवल्यास
जिन्यांची गती तत्काळ थांबावी अशा सुरक्षा योजना केलेल्या असतात. चलित्राच्या चालक
दंडावर एक रॅचेट चाक [→ रॅचेट चाक व खिटी] बसविलेले असते व जर एखादी साखळी तुटली, तर एक खिटी
रॅचेट चाकाच्या दात्यांत बसते व त्यामुळे जिना थांबतो आणि त्याच वेळी चलित्रही
आपोआप थांबते. जिन्याच्या बांधणीत ज्वालाग्राही नसलेले पदार्थच वापरण्यात येतात.
आणीबाणीच्या वेळी जिन्याची गती थांबविण्यासाठी कठड्यात खालच्या व वरच्या
नैल्यामध्ये स्विच बसविलेले असतात. जिना सुरू करण्यासाठी विशिष्ट किल्लीची
आवश्यकता असते.
* फिरते जिने इमारतीत दोन प्रकारे बसविण्यात येतात.
(१)
आडव्यातिडव्या : यात सामान्यतः वरच्या व खालच्या दिशांनी फिरणारे जिने
एकमेकांशेजारी ६०° चा कोन करून
बसविलेले असतात. या व्यवस्थेत किमान जागा लागते व सामान्यतः हाच प्रकार वापरात
आहे. (२) समांतर : यात वरच्या व खालच्या दिशांनी फिरणारे जिने एकाच तिरप्या
प्रतलात बसविलेले असतात. या व्यवस्थेत अधिक जागा व्यापली जाते.
* संकलन *
शरद शिंदे