पेज

☀ राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस

* राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस -

     ११ मे, १९९८ रोजी भारताने केलेल्या अणुचाचणीने आपल्या तंत्रज्ञानातील प्रगती जगाला दाखवली. या प्रगतीचे प्रतीक म्हणून ११ मे हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस’ म्हणून साजरा केला जातो. 
     तंत्रज्ञान हे मानवी संस्कृती घडवणा-या घटकांत शासनव्यवस्था, समाजरचना, कर्म, तत्त्वज्ञान यांच्याइतकेच महत्त्वाचे आहे, असे मानले जाते. भारताचे तंत्रसामर्थ्य आजपर्यंत वेळोवेळी दिसून आलेले आहे.सर्वसाधारणपणे मनुष्याने लावलेल्या आयुधे, साधने, तंत्रे, क्रिया अशा विविध प्रकारच्या, मनुष्याला जगून राहण्यासाठी आणि विकासासाठी उपयोगी अशा शोधांचा (इन्व्हेन्शन्स) तंत्रज्ञानात समावेश होतो. तंत्रज्ञान हे मानवी सर्जनशील प्रज्ञेचे द्योतक आहे.
     आपल्या या सर्जनशीलतेच्या जोरावर आपल्या ज्ञानेंद्रियाच्या आणि शारीरिक क्षमतेच्या हजारोपट पुढे जाऊन मानवाने भौतिक, सामाजिक, सांस्कृतिक प्रगतीचे एकामागोमाग एक टप्पे गाठले आहेत आणि एका बाजूने सूक्ष्मतम अणूतील ऊर्जा आपल्या कामी आणली आहे आणि दुस-या बाजूला अनंत अवकाशात भरारी घेतली आहे.
     आज विज्ञान आणि तंत्रज्ञान हे अनेक वेळा एकत्र मानले गेले असले तरी ते दोन्ही एकत्र नाहीत. विज्ञान हे फार अलीकडचे आहे, तर तंत्रज्ञान लाखो वर्षापूर्वीचे आहे. आधुनिक माणसाच्या पूर्वजांनी जेव्हा लाकूड, दगड आणि प्राण्यांची हाडे यांच्यापासून अगदी साधी शस्त्रे बनवायला सुरुवात केली आणि अग्नीचा शोध लावला, तेव्हापासून तंत्रज्ञान अस्तित्वात आहे.
     सोप्या शब्दात विज्ञान ‘का?’ या प्रश्नाचे उत्तर शोधते, तर तंत्रज्ञान ‘कसे’ याचे. इतिहासामध्ये ‘कसे’ साध्य झाल्यानंतर ‘का’ हा प्रश्न उपस्थित केला गेला याचे अनेक दाखले आहेत. उदा. वाफेचे, डिझेलचे अशी इंजिने वापरात आल्यानंतर कालांतराने त्यांच्या कार्यामागची तत्त्वे सांगणारे उष्मागतिशास्त्र विकसित झाले.
     आता मात्र, विज्ञानाचा पद्धतशीर उपयोग करून नवनवीन उत्पादने, तंत्रे, प्रक्रिया विकसित करण्यासाठी प्रचंड प्रयोगशाळा उभारल्या गेल्या आहेत. आधुनिक औषधनिर्मितिशास्त्र हे याचे बोलके उदाहरण आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आधुनिक जगात एक मोठा, सुसंघटित मानवी व्यवहार झाला आहे.
     सुदैवाने भारताला विसाव्या शतकात असे नेतृत्व लाभले की, ज्यांनी विज्ञान-तंत्रज्ञानाचे महत्त्व ओळखले. देशाच्या प्रगतीसाठी विज्ञान-तंत्रज्ञानाच्या, शिक्षणाच्या, संशोधनाच्या संस्था उभारल्या पाहिजेत, उद्योग उभारले पाहिजेत, हे लक्षात घेऊन त्यांनी पावले उचलली.
     २००८ साली चंद्रावर पोहोचलेले ‘चांद्रयान’, आपण उभारलेल्या अणुभट्टय़ा, १९९८ सालची अणुचाचणी, आपल्या संशोधनसंस्था, माहिती-तंत्रज्ञान आणि दूरसंचार क्षेत्रातील आपली लक्षणीय प्रगती, वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती, अन्नधान्याच्या बाबतीत आपल्याला स्वावलंबी बनवणारी ‘हरितक्रांती’ इत्यादी सर्व अभिमानाच्या बाबी आहेत.
     राष्ट्रीय तंत्रज्ञानाच्या दिवशी त्या आठवून आपल्या स्वसामर्थ्यांची जाणीव करून घ्यायला हवी. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला हवे, अनेक वेळा तंत्रज्ञान ज्यांच्याकडे ते विकत घेण्याची, वापरण्याची क्षमता आहे, त्यांना आणखी पुढे जाण्यासाठी ते उपयोगी पडते, परिणामी समाजातील विषमता वाढते. या विषमतेची दरी कमी कशी करता येईल, तंत्रज्ञान सर्वोपयोगी कसे ठरेल या दृष्टीने विचार आणि कृती करण्यासाठी तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने आपण संकल्पबद्ध व्हावयास हवे.
------------------------------------------------
साभार:-विज्ञान व दिनविशेष
           विज्ञान शिक्षक मित्र

* संकलन *
 शरद शिंदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा