पेज

☀ जागतिक परिचारिका दिन

* जागतिक परिचारिका दिन -
      आज जग ज्या जैविक युद्धाचा सामना करतोय,त्या युद्धातील रणरागिणी म्हणजे आमच्या परिचारिका भगिनीं. आज त्यांच्या कार्याला.. त्यागाला.. कर्तुत्वाला नमन करण्याचा दिवस.अर्थात जागतिक परिचारिका दिन.
      रुग्णसेवेसाठी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा १२ मे १८२० हा जन्मदिन "जागतिक परिचारिका दिन" म्हणून जगभर साजरा केला जातो.आज त्यांचा जन्माला दोनशे वर्षे झाली आहेत.
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल या सहकारी भगिनींसह प्रत्यक्ष युद्धातील सैनिकांच्या सेवेत सहभागी झाल्या.त्यांच्या प्रेरणेमुळे जगभर परिचारिका शिक्षणाची सुरवात झाली. महाराष्ट्रात महर्षी कर्वेंनी SNDT संस्थेच्या मार्फत या शिक्षणाचा पाया रोवला.डॉक्टर आणि रुग्ण यांच्या नात्यातील परिचारिका हा अत्यंत महत्त्वाचा भावनिक......दिलासा देणारा.....आत्मविश्वास वाढविणारा दुवा.
      वेदकाळापासून भारतात रुग्णसेवेचे असाधारण महत्त्व सांगितलेय.चरकसंहितेत तर विस्तृत प्रकाश टाकलाय. भारतात तर आमचा पहिला श्वास सुकर होतो तो या भगिनींमुळेच.
      मातृत्वभाव ही या भगिनींना लाभलेली दैवी देणगीच.परिस्थिती कितीही कसोटीची असो त्या रणरागिणीची सतत सेवा.. त्यागाची परंपरा आत्मविश्वासाने पार पाडतात. या भगिनींच्या सेवेला,त्यागाला शतशः नमन आणि सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!

* फ्लॉरेन्स नाइटिंगेल -
(१२ मे १८२० - १३ ऑगस्ट १९१०)
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. त्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ १२ मे हा त्यांचा जन्मदिवस जगभरामध्ये "जागतिक परिचर्यादिन" म्हणून साजरा केला जातो.
      फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना लहानपणापपासूनच गणितात गती होती. आकडेवारीचे आलेखांच्या माध्यमातून दृश्य सादरीकरण करणे, हे त्याकाळात फारसे प्रचलित नव्हते. विल्यम प्लेफेयर यांनी विकसित केलेल्या पाय आकृतीसारख्या आलेखांचा त्यांनी परिणामकारकपणे वापर केला.
नाइटिंगेल यांचे संख्याशास्त्रातील सर्वात महत्त्वपूर्ण योगदान म्हणजे त्यांनी विकसित केलेली ध्रुवीय क्षेत्र आकृती होय. या प्रकारच्या आलेखास नाइटिंगेल रोझ प्लॉट असेही म्हटले जाते. स्वतः काम करीत असलेल्या लष्करी रुग्णालयातील दर महिन्यातील मृत्यूंची संख्या व कारणे यांचे सादरीकरण करण्यासाठी त्यांनी या आकृतीचा वापर केला. एरवी आकडेवारीच्या जंजाळामुळे संसद सदस्य आणि सरकारी अधिकारी यांच्याकडून असे अहवाल दुर्लक्षित राहात असत. परंतु, नाइटिंगेल यांनी केलेल्या प्रभावशाली दृश्य सादरीकरणामुळे सैनिकांसाठीच्या वैद्यकीय सुविधा किती अपुऱ्या आहेत याची जाणीव होऊन या वैद्यकीय सुविधांचा दर्जा सुधारण्याचे प्रयत्न सुरु झाले. या सर्व कामामुळे रॉयल स्टॅटिस्टिकल सोसायटीच्या पहिल्या महिला सभासद होण्याचा सन्मान १८५९ साली नाइटिंगेल यांना प्राप्त झाला. पुढे अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनने देखील त्यांना सन्माननीय सदस्यत्व बहाल केले.

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका यांच्यासाठी.....

स्वर्गाहुनही प्रिय आंम्हाला अमुचा सुंदर भारत देश,
आम्ही सारे एक जरीही नाना जाती नाना वेष,

या भूमीच्या आम्ही कन्या कोमल भाव मनी,
फूलकोवळ्या तरी प्रसंगी होऊ रणरागिणी,
आवेशाने घुसू संगरी चढवुनिया रणवेष,

श्रीरामाचे श्रीकृष्णाचे अजुन आहे स्मरण मनास,
वीर शिवाजी प्रताप बाजी थोर आमुचा हा इतिहास_
_रक्तामधुनी वीज वाहते उरात भरतो नव आवेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्.....

हिमालयापरि शीतल आम्ही आग पेटती परि उरात,
पाऊल परके पडता येथे बळ वज्राचे याच करांत,
या देशाची गौरवगाथा हाच अम्हांला दे आदेश,
वंदे मातरम्.. वंदे मातरम्..

सर्व लढावू आदर्श भगिनींना परिचारिका दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.. !!

* संकलन *
 शरद शिंदे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा